गौरी विसर्जन झाले , घर पुन्हा शांत वाटायला लागले .खुप जणाींशी गौरी बोलतात .मग मलाच का नाही बोलल्या अत्तापर्यत काही असा विचार सारखा येत होता आणि तेवढ्यात गौर परत आली -
आली आली गौरी धामधूम झाली
माझी मात्र दोन दिवसात पुरती हवा गेली .
गेल्या गौरी म्हणुन बसले होते निवांत सोफ्यावर .
तेवढ्यात बेल वाजली आणि यावेच लागले भानावर.
घरात कोणी असो नसो बेल आपल्यालाच ऐकु येते .
आपसुकच आपलेच पाऊल पहिला दाराकडे जाते .
दार उघडले तर आश्चर्यच वाटले ,डोळ्यातमात्र आनंदाश्रु दाटले .
गौर पुन्हा दारात उभी ,
अश्रुबघुन मलाच म्हटली तु अशी ग कशी ?
भानावर येत पटकन तिला घेतले घरात.
आणि म्हटले काही राहीले का ग तुझे करायचे आनंदाच्या भरात .
तशी ती हासत पटकन बसली .कौतुकाने काहीतरी स्वतःशीच पुटपुटली .
पाणी ,चहा,कॅाफी काय देऊ तुला ,तर हासत हासत म्हणाली टेकु तर दे मला.
किती गडबड करशील सारखी ,
आता तर मी ही नाही तुला नवखी .
थोडा वेळ शांत बसु .एकमेकींची सुखदुःखे वाटुन घेऊन मनसोक्त हासु .
शिक्षण ,लग्न,मुलेबाळे कसरत करत करियर घडे.
यासाठीच वाटतो तुम्हा बायकांचा मला हेवा .
म्हणुनच तर म्हणत असतील बाईपण भारी देवा.
माझ्याबोलण्याने नको फुगुन जाऊ .आपण दोघीही मिळुन आता नवा वसा घेऊ .
तक्रारीचे उपवास आता हळुहळु करायचे,काळजीच्या व्रताला मात्र पु्र्ण विराम द्यायचे .
स्वतःची काळजी घेतलीस तर घर पुढे नेशील ,नाहीतर दुखण्याखुपण्याच्या खाईत स्वतःलाच लोटशील.
विचारांनी स्वतःला आधुनिक बनव
पुढच्या पिढीला मात्र कणखर घडव .
नेहमी चांगल्या गुणांचे कौतुक कर तोंडभरून ,म्हणजे तेच येतील आशीर्वाद रुपाने तुझ्याकडे फिरुन .
भुकेलेल्याला अन्न दे ,तहानलेल्याला पाणी दे तुझ्या मध्ये अन्नपुर्णेचा थोडा तरी अंश वसु दे .
देव देव करणे किंवा न करणे खुप गौण आहे बाई ,शक्य असेल तेव्हा माणुसकीची सेवा करायची करतच जा घाई .
तुझ्या मधली दुर्गा , काली आणि महालक्ष्मीला नेहमीच ठेव जागे,
नेहमी प्रमाणे मी खंबीरपणे आहेच तुझ्या मागे .
उतू नको मातु नको घेतला वसा टाकु नको .
शेवटी उठत उठत म्हटली ती मला ,
पोरी ,
तुझ्यामधल्या मला तु नेहमीच साथ दे .दुसऱ्यां लेकींमधल्या माझ्या अंशालाही नेहमी हात दे . 🙏🙏🙏🙏
-सौ श्रद्धा संजय देगांवकर

Sanjay Devankar ji

Back