हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे राजीव, पण सर्वजण मला राजू म्हणतात आणि मला पण “राजू” च आवडतं कारण त्याच्यात एक आपलेपणा आहे.

मी इयत्ता पाचवी मध्ये एका प्रख्यात मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतो.

माझ्या घरात मी, माझे आई-बाबा आणि माझी लहान बहीण राहतो.

मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी सांगणार आहे. मला खात्री आहे की तुम्हाला त्या नक्की आवडतील.

मी एका मोठ्या कॉलनीमध्ये राहतो. माझ्या कॉलनीत २००-२५० घरे आहेत. कॉलनी मोठी असल्यामळे माझे खूप मित्र आहेत. पण माझे खास मित्र म्हणजे जय आणि संजू.

माझ्या शेजारी दोन घरे सोडून माझा आवडता वरुण दादा राहतो. वरुण दादा कॉलेजमध्ये शिकतो आहे. त्याचं प्रचंड वाचन आणि अनेकविध गोष्टी करण्याची आवड यामुळे त्याला खूप काही माहिती आहे.

मला काहीही प्रश्न पडले, ज्याची उत्तरे घरच्यांना येत नसतील किंवा उत्तर द्यायला कोणाला वेळ नसेल तेव्हा मी हक्काने वरुण दादाकडे जातो. वरुण दादाकडे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मिळतात.

वरुण दादाला प्रश्न विचारणारी मुले आवडतात. आणि मी तर त्याचा सर्वात लाडका आहे.

एके दिवशी मी शाळेतून घरी आलो. मला परीक्षेत वर्गात सर्वात जास्त मार्क मिळाले होते आणि पहिला नंबर आला होता.
माझ्या खास मित्राचे गणित कच्चे असल्यामुळे गणितात त्याला बऱ्यापैकी कमी मार्क मिळाले होते. त्यामुळे तो दुःखी होता.

मी मिळालेल्या यशामुळे शेफारून मित्राला म्हणालो की तू गणितात ढ आहेस. तुला कधीच पहिला नंबर मिळवणे शक्य नाही.


Back

मी असं मुद्दाम म्हणालो नव्हतो पण त्या दिवशी काय झालं होतं कुणास ठाऊक पण माझ्यामुळे तो दुखावला गेला. तेंव्हा मी माझ्या यशाच्या आनंदात असल्यामुळे ते माझ्या लक्षात आलं नाही. पण घरी येता येता माझ्या मनात त्याच्याबद्दल विचार आला की त्याला वाईट वाटलं असेल. आम्ही एकाच बाकावर बसायचो. आता उद्या तो माझ्याशी बोलेल तरी का ?

मजल्यावर पोचलो तोच वरुण दादा समोरून आला. मला हाय केलं, पण माझं लक्ष नव्हतं. मला थांबवून त्याने विचारलं, काय मूड ऑफ कशामुळे झालाय ?

मी त्याला शाळेत काय घडलं ते सर्व सांगितलं.

दादा म्हणाला की तू तुझ्या वर्गात पहिला आलास पण इतरही तुकड्या आहेत. त्यामधील एखाद्याला तुझापेक्षा जास्त मार्क असू शकतात. इतरही शाळा आहेत. तू एकटाच पहिला आला आहेस का ?
आणि एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का, की तुझ्या वर्गात पहिला येण्यामुळे जर तू शेफारून जात असशील तर तुझ्या वर्गातील इतर मुलांना तुझ्याबद्दल आपलेपणा वाटेल की असूया वाटेल ?

तू पहिला नंबर मिळवलास पण तूझ्या वर्ग मित्रापासून दूर गेलास. तुमच्या मैत्री मध्ये दुरावा आला.

तुमने तो छोटी चीज पाकर बडी चीज खो दी

मी म्हणालो की मला या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय, पण आता करायचं काय ?

दादा म्हणाला की मी जे सांगितलं त्याचा असा अर्थ नाहीये की तू मार्क कमी मिळवायचे. तू भरपूर अभ्यास करायचाच. पण तुझं गणित चांगलं आहे , तर तू मित्राला मदत करायची आणि त्यालाही गणितात चांगले मार्क मिळतील असा प्रयत्न करायचा.

आणि सर्वात आधी तुझ्या मित्राची माफी मागायची आणि आपलं झालेलं बोलणं समजावून सांगायचं.

तुमचं लहान मुलांचं बरं असतं, केलेल्या चुकीबद्दल माफी मागायला कठीण जात नाही पण आपण जसे मोठे होत जातो तसा आपला अहंकार मधे येतो. मोठा झाल्यावरही तू अहंकाराच्या आहारी जाऊन मैत्री तोडू नकोस.

दुसऱ्या दिवशी मी मित्राची माफी मागितली आणि त्याला ‘बडी चीज, छोटी चीज’ सगळं समजावून सांगितलं. त्या दिवसापसूनच आमची दोस्ती अजूनच घट्ट झाली.

Atul Pitkar Ji

Back